तीन महिन्यांत निघणार निविदा ; शहरातील चार पुलांचे १३५ कोटी पाण्यात ?
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) शेंद्रा ते बजाजनगर (ओअॅसिस चौक) या मार्गावर मराठवाड्यातील सर्वांत लांब अखंड उड्डाणपूल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला असून, सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या कामाची निविदा पुढील तीन महिन्यांत काढण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी दिली. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जालना रोडवरील सुमारे १३५ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या चार उड्डाणपुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्या उड्डाणपुलाच्या मार्गात येणारे सिडको बसस्थानक, मोंढा नाका, क्रांती चौक आणि महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) येथील पूल पाडावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. या पुलांना उभारून अवधी १० ते १५ वर्षे झाली आहेत.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले हे पूल आता भविष्यातील वाहतुकीसाठी अपुरे ठरत
असल्याने नियोजनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पुलांची लांबी सुमारे ५०० ते १ हजार मीटर, तर रुंदी १२ ते १५ मीटर आहे. अवघ्या दीड दशकातच त्यांच्यावर पाडकामाची वेळ येत असल्याने सार्वजनिक निधीच्या कार्यक्षम वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दररोज लाखो वाहनांची वर्दळ
शेंद्रा ते वाळूजदरम्यानचा जालना रोड शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज दोन ते तीन लाख वाहनांची वर्दळ असल्याचे रस्ते अहवालात नमूद आहे. त्यात सुमारे ६० टक्के दुचाकी, २० टक्के कार, १० टक्के रिक्षा आणि १० टक्के अवजड वाहनांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. पीक अवर्समध्ये या मार्गावरील वाहतूक आणखी वाढते. नव्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दीर्घकालीन पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न असला, तरी जुन्या पुलांचे पाडकाम आणि नव्या पुलाचे बांधकाम या काळात वाहतुकीचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग, टप्प्याटप्प्याने बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
१३५ कोटींच्या खर्चाचे काय ?
नव्या प्रकल्पासाठी सुमारे चार हजार कोटी रुपये खर्च होणार असताना, अवघ्या १० ते १५ वर्षांपूर्वी उभारलेल्या चार पुलांवर झालेला सुमारे १३५ कोटी रुपयांचा खर्च आणि त्यांच्या पाडकामाचा अतिरिक्त खर्च यामुळे सार्वजनिक निधीच्या नियोजनावर चर्चा सुरू झाली आहे. वाहतुकीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असले, तरी दीर्घकालीन नियोजनाचा अभाव भविष्यात पुन्हा मोठ्या खर्चाला कारणीभूत ठरणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













